if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

गीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६

प्रेमाची चाहूल

 प्रेमाची चाहूल


- कवी - निशिकांत हारुगले


चांदण्यांच्या सरींमध्ये, तुझीच चाहूल लागली,

 मंद वाऱ्याच्या कुशीत, प्रीत माझी जागली। 

 नयनी तुझ्या पाहताना, हरपली ही सांज सारी,

 तूच माझी स्वप्नराणी, तूच जीवाची फुलवारी॥


धुंद धुक्याच्या पडद्याआड, रूप तुझे लपले गं,

मनमोहिनी तुझ्या हास्याने, चित्त माझे जिंकले गं।

पानोपानी दवबिंदूंची, मोतीमाळ सजली,

तुझ्या स्मिताच्या किरणांनी, रात्र माझी उजळली॥


तारकांच्या अंगणात मी, तुझीच प्रतिमा शोधतो,

श्वासाश्वासांत तुझ्या नावाचा, मंद सुगंध घेतो।

दूर असून जवळ भासे, ही कशी प्रीत अनोखी,

तुझ्याविना या हृदयाला, वाटे दुनिया परकी॥


चांदण्यांच्या सरींमध्ये, तुझीच चाहूल लागली,

मंद वाऱ्याच्या कुशीत, प्रीत माझी जागली।

नयनी तुझ्या पाहताना, हरपली ही सांज सारी,

तूच माझी स्वप्नराणी, तूच जीवाची फुलवारी॥


निळ्या नभाच्या काठावरती, संध्यारंग विरघळला,

तुझ्या आठवणींचा सुगंध, माझ्या मनात दरवळला।

ओढ तुझी अनिवार झाली, शब्द सारे मूक झाले,

नयनांच्या त्या भाषेमधले, अर्थ सारे स्पष्ट झाले॥

कदंबाच्या सावलीखाली, तुझी वाट मी पाहतो,

पाऊलवाटेच्या वळणावरती, तुझाच भास मी पाहतो।

ये ना सखे, या चांदण्यात, हात तुझा हाती दे,

जन्मोजन्मीच्या या नात्याला, प्रेमाचे नाव नवे दे॥


झुळझुळणाऱ्या निर्झराला, सांगितले मी गुपित रे,

तुझ्याविना या जीवाला, नाही दुसरे जगणे रे।

फुलपाखरू बनून मन हे, तुझ्याच भोवती फिरते,

तुझ्या एका हास्यासाठी, शंभर जन्मही सरते॥


पहाटेच्या त्या किरणांत, तुझीच छबी उमटावी,

संध्याकाळी नभात माझ्या, तुझीच चांदणी फुलावी।

क्षितिजाच्या त्या पल्याड जाऊ, स्वप्नांची नगरी बांधू,

तुझ्या-माझ्या प्रेमकथेची, नवी कहाणी लिहू॥


नशिबाच्या या लेखणीने, भाग्य आपुले कोरूया,

सुख-दुःखांच्या वाटेवरती, सोबत दोघे चालूया।

तू जर माझी साथ देशील, काळही थांबेल क्षणी,

प्रेम आपले अमर राहो, जन्मोजन्मीच्या कहाणी॥


चांदण्यांच्या सरींमध्ये, तुझीच चाहूल लागली,

मंद वाऱ्याच्या कुशीत, प्रीत माझी जागली।

नयनी तुझ्या पाहताना, हरपली ही सांज सारी,

तूच माझी स्वप्नराणी, तूच जीवाची फुलवारी॥


तूच माझी स्वप्नराणी...

तूच जीवाची फुलवारी...

तुझ्याच प्रेमाच्या सावलीत,

उमलू दे ही प्रीत सारी...

बुधवार, १३ मे, २०२६

डोईवर हारा

 

डोईवर हारा

डोईवर हारा, आरोळी करा.

जाती गल्ली बोळातून,

घे ग हौसा, तारुबाई दिवसा,

काहीतरी घ्या की हो…….


पार्वतीच्या कपाळाला चंद्रकोर शोभेल,

 छबूच्या धार्या केसात गंगावण साजेल. 

 ये गा मोरू, भोवरा फिरवू,

 पारावरती र……

डोईवर हारा…..


दंतमंजन टॉपच हाय,

हिरड्यांची होईल कमाल बाय.

ऊसाच कांड, कणसाचं दान,

काडकाड फोडील म्हातारं वटाणं फुटाणं

घ्या हो घ्या दंतमंजन घ्या,

निरोगी दात मिळवा की हो.

डोईवर हारा…..,…


जना नी गौरा बसली हौसा,

 वाकळ शिवत मांगरात दिवसा,

 घ्या हो घ्या, सुया दोर घ्या, 

 दुपटी वाकळ शिवा की हो.

डोईवर हारा ……….


काळ्यामनी शोभेल मंगळ सरी,

बाळाच्या हाती , मनगटी भारी.

डोळ्यात काजळ केसातील चाप,

काय काय विकू ग बाय……

डोईवर हारा ……. ..

…… …… ……..



कवी : निशिकांत हारुगले

.


मंगळवार, १२ मे, २०२६

घाट शिदोरी

 घाट शिदोरी

घाट शिदोरी


सरता शिशिर, अंगणी बहरला वसंत.

उजवल्या गोड गळ्याने गाते कोगुळ झाडीत.

मन झाले रे प्रसन्न, पाहता सौंदर्यास.

डवरल्या झाडे वेली, डोंगर दर्यात,

नागमोडी वाटेने चालतो ही पायवाट.

खुणावती रानमेवे त्या झाडोर्यात.

चल ग सये जाऊ त्या आड रानात.

घाटाची शिदोरी घेऊ पळस पानात.

बहरली ती कटकी, तोरण वेल सजली. 

 आंब्या, फणसाची तर दुनियाच न्यारी.

जांभळं, उंबर, द्रोणात भरली साजरी भोकर.

आंबट – गोड चवीची त्यात भरली साखर.

चल ग सये जाऊ त्या आडरानात,

घाटाची शिदोरी घेऊ पळस पानात.

आनंदाने चढा चढ, घाट सह्याद्रीचा.

साजऱ्या मेव्याचा आनंद प्रेमाचा.

चाखता गोडी ही साजिर्या फळांची.

बहरेल आनंद, तृप्ती होईल मनाची.

चल ग सये जाऊ आड रानात, 

 घाटाची शिदोरी घेऊ पळस पानात.

……. …….. ……..

 कवी : निशिकांत हारुगले


सोमवार, ११ मे, २०२६

नकळत अलगत वळणावर

 

नकळत अलगत वळणावर,


नकळत अलगत वळणावर,

ती नजर भेट होते.

पाहता लाजून सखया 

 प्रीत बहराला येते.

 असे अबोल प्रेम हे,

बहरावं बंद कप्प्यात.

स्वप्नातील ती भेट,

 प्रकटावी सत्यात.

असे प्रेम मोहरुन यावे,

वसंताच्या बहरात.

गूज बोलणे घडावे,

नजरेच्या मिलनात.

सांज होता पक्षी ही,

येती माघारी घरट्यात.

किलबिल जागी होई,

सुंदर साजिर्या खोप्यात.

गूज पानात जाईच्या,

 बोल बोलती मंजुळ.

प्रीतीचा हा वसंत,

 बहराव हृदयाच्या अंतरात.

रंग उधळीत सृष्टी,

दाखवते नवे रुप.

तुझं पाहता सखया,

मन बेधुंद झाले.

आठवणींचा हिंदोळा,

उचंबळे काळजात.

सांज होता मावळती,

रविराजा जातो अस्ती,

उंच माळावर बहरावी आपली अबोल प्रीती.

……. ……. ……

,

बुधवार, ६ मे, २०२६

आठवण

 आठवण

सोन पावलांनी, आला दारी या वसंत,

किलबिल पाखरांची, अंगणी दारी झाडी कोटरात.

सडा, संमार्जन करुन दारी,

रेखिते सुंदर रांगोळी.

रंग भरुनी स्वप्नांचे, दृश्य साठविते अक्षी,

हुरहुर दाटली ही, माझ्या अबोल मनात.

सांज येते गलबलूनी, आठवणीच्या आसवात.

वाट पाहुनी पाहुनी, शिणले हे डोळे.

 कधी ऐशी रे पाखरा, फिरुनी या खोप्यात.

नको थाट माट, नाही दागिन्यांची हौस.

एक स्मित असावे, अबोल त्या अधरात.

पडवीतल्या हिंदोळ्यावर , घेऊ अनुरागी झोका.

बहराव आनंदी आनंद, माझ्या कौलारू या घरा.

दिसता ती सोनपावले, मन झाले रे धन्य.

आनंदले गोकुळ प्रकटले, घर झाले रे प्रसन्न.


प्रेमाची चाहूल

 प्रेमाची चाहूल - कवी - निशिकांत हारुगले चांदण्यांच्या सरींमध्ये, तुझीच चाहूल लागली,  मंद वाऱ्याच्या कुशीत, प्रीत माझी जागली।   नयनी तुझ्या ...