if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६

प्रेमाची चाहूल

 प्रेमाची चाहूल


- कवी - निशिकांत हारुगले


चांदण्यांच्या सरींमध्ये, तुझीच चाहूल लागली,

 मंद वाऱ्याच्या कुशीत, प्रीत माझी जागली। 

 नयनी तुझ्या पाहताना, हरपली ही सांज सारी,

 तूच माझी स्वप्नराणी, तूच जीवाची फुलवारी॥


धुंद धुक्याच्या पडद्याआड, रूप तुझे लपले गं,

मनमोहिनी तुझ्या हास्याने, चित्त माझे जिंकले गं।

पानोपानी दवबिंदूंची, मोतीमाळ सजली,

तुझ्या स्मिताच्या किरणांनी, रात्र माझी उजळली॥


तारकांच्या अंगणात मी, तुझीच प्रतिमा शोधतो,

श्वासाश्वासांत तुझ्या नावाचा, मंद सुगंध घेतो।

दूर असून जवळ भासे, ही कशी प्रीत अनोखी,

तुझ्याविना या हृदयाला, वाटे दुनिया परकी॥


चांदण्यांच्या सरींमध्ये, तुझीच चाहूल लागली,

मंद वाऱ्याच्या कुशीत, प्रीत माझी जागली।

नयनी तुझ्या पाहताना, हरपली ही सांज सारी,

तूच माझी स्वप्नराणी, तूच जीवाची फुलवारी॥


निळ्या नभाच्या काठावरती, संध्यारंग विरघळला,

तुझ्या आठवणींचा सुगंध, माझ्या मनात दरवळला।

ओढ तुझी अनिवार झाली, शब्द सारे मूक झाले,

नयनांच्या त्या भाषेमधले, अर्थ सारे स्पष्ट झाले॥

कदंबाच्या सावलीखाली, तुझी वाट मी पाहतो,

पाऊलवाटेच्या वळणावरती, तुझाच भास मी पाहतो।

ये ना सखे, या चांदण्यात, हात तुझा हाती दे,

जन्मोजन्मीच्या या नात्याला, प्रेमाचे नाव नवे दे॥


झुळझुळणाऱ्या निर्झराला, सांगितले मी गुपित रे,

तुझ्याविना या जीवाला, नाही दुसरे जगणे रे।

फुलपाखरू बनून मन हे, तुझ्याच भोवती फिरते,

तुझ्या एका हास्यासाठी, शंभर जन्मही सरते॥


पहाटेच्या त्या किरणांत, तुझीच छबी उमटावी,

संध्याकाळी नभात माझ्या, तुझीच चांदणी फुलावी।

क्षितिजाच्या त्या पल्याड जाऊ, स्वप्नांची नगरी बांधू,

तुझ्या-माझ्या प्रेमकथेची, नवी कहाणी लिहू॥


नशिबाच्या या लेखणीने, भाग्य आपुले कोरूया,

सुख-दुःखांच्या वाटेवरती, सोबत दोघे चालूया।

तू जर माझी साथ देशील, काळही थांबेल क्षणी,

प्रेम आपले अमर राहो, जन्मोजन्मीच्या कहाणी॥


चांदण्यांच्या सरींमध्ये, तुझीच चाहूल लागली,

मंद वाऱ्याच्या कुशीत, प्रीत माझी जागली।

नयनी तुझ्या पाहताना, हरपली ही सांज सारी,

तूच माझी स्वप्नराणी, तूच जीवाची फुलवारी॥


तूच माझी स्वप्नराणी...

तूच जीवाची फुलवारी...

तुझ्याच प्रेमाच्या सावलीत,

उमलू दे ही प्रीत सारी...

दिर्बा माऊली

 दिर्बा माऊली


हिरवीगार राई, नीलांबर वरी,

 डोहात पडते दरबकड्याचे पाणी,

 त्यात बसली तपसाधनेला,

 माझी दिर्बा माऊली,

माझी दिर्बा माऊली

 सह्यागिरीचा सुटला वारा,

 पखाल घेऊनी कडा तो चढला.

 पाझरती त्या निरधारा,

 हरित सह्यगिरीवरती, हरित सह्यगिरीवरती,

 सुटला पाझर, निर्मिले ओहळ,

 डोहात पडते दर्ब कड्यावरून, बाई.. डोहात पडते दर्ब कड्यावरून.

 हिरवीगार राई, नीलांबर वरी. 

 डोहात पडते, दर्बकड्याचे पाणी.

 त्यात बसली तपसाधनेला.

 माझी दीर्बा माऊली, हो… माझी दिर्बा माऊली.

थंडगार डोहात तुझं गं स्थान,

 कुमारीका तू देवी महान.

 ब्रह्मरंध्री सूर्य टिळा,

 राईचे वस्त्र तुझ्या डोंगरा.

 चरणात वाहते दुधाची गंगा,

 त्यात तुझा उजवा फाटा.

त्यात तुझा उजवा फाटा.

 हिरवीगार राई, नीलांबर वरी.

 डोहात पडते दर्ब कड्याचे पाणी.

 त्यात बसली तपसाधनेला,

 माझी दिर्बा माऊली, माझी दिर्बा माऊली

 नवविवाहिता पाटलीन बाई,

 राई चढुनी दर्शना आली.

 पायात वाजे राईचा पाला,

 सावज समजूनी त्यांनी नेम धरिला.

सावज समजूनी त्यांनी नेम धरिला.

 रक्षणासाठी उभी दिर्बा, उभी दिर्बा,

 घनदाट झाडीत किरणांचा शिरकाव केला,

  साडीचा पदर झगमगला. हो, साडीचा पदर झगमगला.

 घाबरून शिकारी पळून गेला.

 रक्षण करती देवी दिरबा, रक्षण करती देवी दिर्बा. हिरवीगार राई, निलांबर वरी.

 डोहात पडते दरबकड्याचे पाणी.

 त्यात बसली तपसाधनेला,

 माझी दिर्बा माऊली. माझी दिर्बा माऊली.

 चहु मूलखात कुठेही तुम्ही राहा,

 दही भात सांगड चुकवू नका.

 रक्षण करण्या येईल दिर्बा,

 कुठूनही भक्तगण हाक हो मारा.

कुठूनही भक्तगण हाक हो मारा.

 हिरवीगार राई नीलांबर वरी,

 डोहात पडती दरब कड्याचे पाणी,

 त्यात बसली तपसाधनेला,

 माझी दिरबा माऊली, हो माझी दिर्बा माऊली.



कवी : निशिकांत हारुगले


गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

प्रेमाचे जाळे

 प्रेमाचे जाळे


दूर दूर इथे टेकावर आंब्याखाली वाट पाहत उभा ,

कधी येशील भेटायला प्राणप्रिय पाखरा.

 वाट पाहून पाहून हे शिणले ग डोळे,

 आता तरी दर्शन देण्या भेटायला ये.

 येना जाणारा विचारी काय करतोस तिथे,

 सांगे मी ग कारणे निबंध लिहितो इथे.

 मज पुसे मग ते कोणता निबंध?

 मी सांगे जळात बुडणाऱ्या सूर्याचे बिंब.

 कुठे दडलीस तू कोणत्या पाना आड,

 आता तरी दर्शन देण्या ए पुलावर.

 दुरुन का पाहून माझे होईल समाधान,

 हृदयातून प्रेमाचे उचंबळेल तुषार.

दूर दिशे सखीसह ओढा पुलावर

प्राण प्रिय सखी,

 दुरूनच पाहून छबी साठवितो अक्षी.

लपून छपून मागून येऊन म्हणती माझे मित्र,

 हेच का तुझे निबंधातले सूर्यबिंब.

 सूर्य बिंब नव्हे हे रे, ही तर शततारका,

पाया पाशी तुझं उभी न करता मारीते रे मूरका.

 शंभर फुलांवर फिरणारे ते फुलपाखरू,

  तिला पाहता तुझा रे फुकट वेळ नको दवडू.

 अभ्यास करून प्रगतीच्या लाग मागे मागे,

 हिच्या परीस हजार जणी येथील भागेभागे.

 घाटावर सूर्यबिंब ते मावळत चालले, तिला पाहून पाहून तुझे रे डोळे वटांबले.

 

 कवी : निशिकांत हारुगले

मंगळवार, १९ मे, २०२६

पाहूया रम्य देखावा

 

पाहूया रम्य देखावा


निळ्या, निळ्या खाडी मध्ये,

डुंबती या मासोळ्या.

खुणवूणी काठावरी,

बोलती अबोल कळ्या.

दूर तिथे क्षितिजावर,

बुडे सोन्याचा गोळा.

चल,चल, सये सखे, 

पाहूया रम्य देखावा.

दूर दूर डोंगरकडे,

कसे पाझरले.

श्वेत रंगाचे जलप्रपाती

दूध पहा ओघळ.

आनंदल्या वेली - लता,

न्हाती धुती झाडे.

चल चल ……….

माडा पोफळीच्या बागा,

बेधुंद डोलती भात खाचरे.

त्यावरून भरारी घेती,

सुंदर सुंदर पाखरे.

चल चल ……….

अशा सुंदर घाट कोकणी,

जावे अतिथी होऊन.

मनातील निराश आशा,

 जातील निघून,

चल चल सये सखे,

पाहूया रम्य देखावा.

…………………………..

कवी : निशिकांत हारुगले.


बुधवार, १३ मे, २०२६

डोईवर हारा

 

डोईवर हारा

डोईवर हारा, आरोळी करा.

जाती गल्ली बोळातून,

घे ग हौसा, तारुबाई दिवसा,

काहीतरी घ्या की हो…….


पार्वतीच्या कपाळाला चंद्रकोर शोभेल,

 छबूच्या धार्या केसात गंगावण साजेल. 

 ये गा मोरू, भोवरा फिरवू,

 पारावरती र……

डोईवर हारा…..


दंतमंजन टॉपच हाय,

हिरड्यांची होईल कमाल बाय.

ऊसाच कांड, कणसाचं दान,

काडकाड फोडील म्हातारं वटाणं फुटाणं

घ्या हो घ्या दंतमंजन घ्या,

निरोगी दात मिळवा की हो.

डोईवर हारा…..,…


जना नी गौरा बसली हौसा,

 वाकळ शिवत मांगरात दिवसा,

 घ्या हो घ्या, सुया दोर घ्या, 

 दुपटी वाकळ शिवा की हो.

डोईवर हारा ……….


काळ्यामनी शोभेल मंगळ सरी,

बाळाच्या हाती , मनगटी भारी.

डोळ्यात काजळ केसातील चाप,

काय काय विकू ग बाय……

डोईवर हारा ……. ..

…… …… ……..



कवी : निशिकांत हारुगले

.


मंगळवार, १२ मे, २०२६

घाट शिदोरी

 घाट शिदोरी

घाट शिदोरी


सरता शिशिर, अंगणी बहरला वसंत.

उजवल्या गोड गळ्याने गाते कोगुळ झाडीत.

मन झाले रे प्रसन्न, पाहता सौंदर्यास.

डवरल्या झाडे वेली, डोंगर दर्यात,

नागमोडी वाटेने चालतो ही पायवाट.

खुणावती रानमेवे त्या झाडोर्यात.

चल ग सये जाऊ त्या आड रानात.

घाटाची शिदोरी घेऊ पळस पानात.

बहरली ती कटकी, तोरण वेल सजली. 

 आंब्या, फणसाची तर दुनियाच न्यारी.

जांभळं, उंबर, द्रोणात भरली साजरी भोकर.

आंबट – गोड चवीची त्यात भरली साखर.

चल ग सये जाऊ त्या आडरानात,

घाटाची शिदोरी घेऊ पळस पानात.

आनंदाने चढा चढ, घाट सह्याद्रीचा.

साजऱ्या मेव्याचा आनंद प्रेमाचा.

चाखता गोडी ही साजिर्या फळांची.

बहरेल आनंद, तृप्ती होईल मनाची.

चल ग सये जाऊ आड रानात, 

 घाटाची शिदोरी घेऊ पळस पानात.

……. …….. ……..

 कवी : निशिकांत हारुगले


सोमवार, ११ मे, २०२६

लावणीचा शृंगार नऊवारी हवा

 लावणीचा शृंगार नऊवारी हवा 



ब्रम्हरंध्री , शोभे चंद्रकोर,

महाराष्ट्राचा महिमा थोर,

साज लेऊन शृंगाराचा,

महाराष्ट्र मंचकी उभा s s २

लावणीचा शृंगार नऊवारी हवा s s २

पायी घुंगर रुणुझुणु बोलती,

गीतास संगीत साथ देती,

मर्यादेची सीमा सांगती, 

पायी जोडावी पहा, २

लावणीचा ...... ......

नाकी नथ, कानी बुगडी,

अंबाड्यावर फुल चुडामणी,

जरतारी पैठणी पदरावरती,

मयूर नाचती पहा, २

लावणीचा...... .......

कशाला अश्लीलता नौटंकीची,

उत्तर देश प्रांताची,

मराठ मोळी संस्कृती आपली,

नऊवारी या साडीमध्ये

शोभते नार कशी पहा, हो....२

लावणीचा ...... ......

घाट असो वा अपरान्त देश,

वऱ्हाड असो की अहिराणी प्रांत,

मराठवाडा अन् कुंतल देशी, 

 शालीनता तुम्ही जपा, २

लावणीचा ...... .......

....... .........





प्रेमाची चाहूल

 प्रेमाची चाहूल - कवी - निशिकांत हारुगले चांदण्यांच्या सरींमध्ये, तुझीच चाहूल लागली,  मंद वाऱ्याच्या कुशीत, प्रीत माझी जागली।   नयनी तुझ्या ...